पाचोरा प्रतिनिधी । लग्नाच्या तयारीने गजबजलेल्या घरावर नियतीने क्रूर घाला घातल्याची हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यात घडली. सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनावरून परतत असताना कारचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात ८ मे रोजी विवाहबंधनात अडकणारी २२ वर्षीय शिका बेलसरे हिच्यासह ४२ वर्षीय मिनाताई मानकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
बेलसरे कुटुंबीयांनी लग्नाची पत्रिका सप्तश्रृंगी मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी वणी गडावर दर्शन घेतले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात मंगळवारी सकाळी पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाजवळ त्यांच्या वाहनाचा अचानक टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की मिनाताई मानकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी शिका बेलसरे हिने उपचारासाठी जळगावला नेत असताना अखेरचा श्वास घेतला.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस, ‘जय मल्हार’ रुग्णवाहिकेचे चालक बबलू मराठे आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य केले. मात्र नियतीपुढे सर्व प्रयत्न अपुरे ठरले. अवघ्या काही दिवसांवर आलेले लग्न आणि घरातील आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.



