जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे बालविवाह लावून देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कृत्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहून तिने एका बालकाला जन्म दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका तरुणाशी लग्न झाले आहे. पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही, तिला ‘तू आता माझी पत्नी आहेस’ असे सांगून तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. २८ एप्रिल रोजी पीडितेची प्रसूती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवली. हा गुन्हा सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आला होता, त्यानंतर तो कायदेशीर प्रक्रियेनुसार यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
यावल पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), ६५(१) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ आणि बाल विवाह प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुसलोद्दीन शेख हे करत आहेत. सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.



