जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढावे, तपासातील त्रुटी दूर व्हाव्यात आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी या उद्देशाने जळगाव पोलीस दलाच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून जळगाव विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ८ ते ११ या वेळेत ही तीन तासांची अभ्यासपूर्ण कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेला पीडीजे आर. एन. जोशी, सेशन जज एम. एस. बडे, एस. व्ही. खोंगल, एम. जी. चव्हाण, के. के. चाफळे, डीजीपी काब्रा, चोरडिया तसेच प्रॉसिक्यूशन अॅडिशनल डायरेक्टर श्रीमती ढगे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी, एसडीपीओ, दुय्यम अधिकारी आणि सुमारे १०० अंमलदार उपस्थित होते.
कार्यशाळेत गुन्हे तपासादरम्यान पुरावे संकलित करताना होणाऱ्या तांत्रिक चुका, दोषारोपपत्रातील त्रुटी आणि न्यायालयीन प्रक्रियेत आवश्यक असलेली काळजी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. न्यायाधीश आणि सरकारी वकिलांनी पोलिसांना प्रत्यक्ष खटल्यांमधील अनुभव सांगत प्रभावी तपास, वैज्ञानिक पुरावे आणि मजबूत प्रॉसिक्यूशनचे महत्त्व पटवून दिले.
“केवळ आरोपीला अटक करणे नव्हे, तर न्यायालयात ठोस पुरावे सादर करून गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणे हेच पोलिसांचे अंतिम कर्तव्य आहे,” असा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. या कार्यशाळेमुळे तपास यंत्रणा अधिक सक्षम होऊन जिल्ह्यातील ‘कॉन्व्हिक्शन रेट’ वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



