जळगाव प्रतिनिधी | राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी नुकतीच निवडणूक जाहीर झाली असून, या घोषणेमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. जागांची घोषणा होताच जिल्ह्यातील अनेक राजकीय लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांनी आतापासूनच ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमधील दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी अंतर्गत पातळीवर मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपमधून कैलास आप्पा सोनवणे यांचे नाव आघाडीवर :
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून एक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण नाव समोर आल्याने राजकीय गोटात कमालीची खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे संकटमोचक आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत खंदे समर्थक, तसेच त्यांच्या पहिल्या आमदारकीपासून सावलीसारखे सोबत असलेले माजी नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे यांचे नाव सध्या विधान परिषदेसाठी जोरदार चर्चेत आहे. पक्षाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि गिरीश महाजन यांच्याशी असलेले निकटचे संबंध पाहता, सोनवणे यांना या निवडणुकीत मोठी संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
इच्छुकांची मोठी यादी :
कैलास सोनवणे यांच्यासोबतच भाजपमधून इतरही अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्ते या शर्यतीत उतरले आहेत. यामध्ये माजी आमदार चंदूलाल पटेल, नंदू आडवाणी, डॉ. केतकी पाटील, नंदू महाजन यांच्यासह पाचोऱ्यातील सक्रिय कार्यकर्ते अमोल शिंदे आणि रोहित निकम यांच्या नावांचीही पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे.
शिवसेना शिंदे गटातही युवा नेत्यांची तयारी :
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) देखील या निवडणुकीत मागे नसून त्यांच्याकडूनही अनेक युवा आणि मातब्बर चेहऱ्यांची नावे समोर येत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील आणि पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील या दोन्ही युवा नेत्यांची नावे या शर्यतीत आघाडीवर आहेत. या दोन्ही नेत्यांनी निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघात आतापासूनच मोर्चेबांधणी आणि तयारी सुरू केली आहे.
एकंदरीत, विधान परिषदेच्या या जागांसाठी जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली असून, वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



