नवी दिल्ली वृत्तसेवा | देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी २५ मे रोजी पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली ही चौथी दरवाढ आहे. या नव्या दरवाढीमुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
ताज्या दरवाढीनुसार, डिझेलच्या दरात प्रति लिटर २.७१ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.६१ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ९५.२० रुपये, तर पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये झाला आहे. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत या दरवाढीनंतर पेट्रोल १११.२१ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९७.८३ रुपये प्रतिलिटरने मिळणार आहे. याआधी दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच २३ मे रोजी पेट्रोल ८७ पैसे आणि डिझेल ९१ पैशांनी महागले होते. तसेच १५ मे आणि १९ मे रोजीही इंधनाचे दर वाढवण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांतील पहिल्या टप्प्यात तीन रुपये आणि नंतर आणखी दोनदा ही दरवाढ झाली होती.
चार महानगरांमधील २५ मे चे नवे दर (प्रति लिटर):
दिल्ली : पेट्रोल १०२.१२ रुपये (+२.६१) | डिझेल ९५.२० रुपये (+२.७१)
मुंबई : पेट्रोल १११.२१ रुपये (+२.७२) | डिझेल ९७.८३ रुपये (+२.८१)
कोलकाता : पेट्रोल ११३.५१ रुपये (+२.८७) | डिझेल ९९.८२ रुपये (+२.८०)
चेन्नई : पेट्रोल १०७.७७ रुपये (+२.४६) | डिझेल ९९.५५ रुपये (+२.५७)
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही दरवाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, लागोपाठ होत असलेल्या या वाढीमुळे वाहतूक खर्च वाढून महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



