जळगाव/लडाख प्रतिनिधी | भारतीय सैन्यदल आणि जळगाव येथील आर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू-काश्मीरमधील ट्याक्शी, नुब्रा व्हॅली (लडाख) या अत्यंत दुर्गम व उंच हिमालयीन भागात १९ ते २५ मे दरम्यान भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. नाशिक आणि मालेगाव येथील १९ तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने या शिबिरात शेकडो स्थानिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली.
आर्या फाउंडेशनचे प्रतिनिधी ऋषिकेश परमार यांनी या पथकाचे नेतृत्व केले, तर अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि सैन्यदलासोबतच्या पत्रव्यवहारामुळे या शिबिराला मंजुरी मिळाली.
या शिबिरादरम्यान महिलांचे आरोग्य, बालआरोग्य, त्वचारोग आणि वृद्ध नागरिकांच्या (जेरियाट्रिक) समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. तपासणी दरम्यान स्थानिक महिलांमध्ये रक्ताल्पता (ॲनिमिया), सांधेदुखी आणि आरोग्याविषयीच्या जागरूकतेचा अभाव दिसून आला. शालेय विद्यार्थ्यांची तपासणी केली असता, अनेक मुलांमध्ये दृष्टीदोष आणि व्हिटॅमिन ‘अ’ ची कमतरता प्रकर्षाने आढळून आली. तसेच, उंचावरील कठीण हवामानामुळे वृद्धांमध्ये कॅल्शियम व व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे हाडांचे विकार आणि लहान मुलांमध्ये पोषणाची तातडीची गरज अधोरेखित झाली. कोरड्या हवामानामुळे ‘झेरोडर्मा’ (त्वचेचा कोरडेपणा) या त्वचारोगाचे प्रमाणही अधिक आढळले.
वैद्यकीय पथकाने या दुर्गम भागात सातत्यपूर्ण आरोग्य मोहीम राबवणे, शालेय मुलांसाठी चष्मे वाटप, नियमित लसीकरण आणि महिलांमध्ये कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण सुरू करण्याची महत्त्वाची शिफारस केली आहे. “या शिबिरामुळे दुर्गम भागातील आरोग्य समस्यांची ओळख पटली असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे स्थानिक समाज आणि आरोग्य यंत्रणेत विश्वासाचे व आपुलकीचे नाते अधिक दृढ होईल,” असा विश्वास आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.



