भुसावळ प्रतिनिधी | जळगाव रोड परिसरातील हिरो शोरूमच्या मागे बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या दोन संशयित इसमांना भुसावळ शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून १ गावठी बनावटीचा कट्टा, २ जिवंत राऊंड आणि १ टोकदार चाकू अशी एकूण १२ हजार ३०० रुपये किमतीची घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, जळगाव रोडवरील हिरो शोरूमच्या मागे दोन संशयित इसम गावठी कट्ट्यासह फिरत आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि राहुल भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खाजगी मोटरसायकलने तात्काळ परिसरात पेट्रोलिंग सुरू केली.
०५ जून रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास अंधारात एका इलेक्ट्रिक मोटरसायकलवर दोन संशयित तरुण उभे असलेले दिसले. पोलिसांनी जवळ जाताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना जागीच वेढा घालून ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे आढळून आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विशाल दादा सुरवाडे आणि शुभम बबन वैद्य (दोन्ही रा. भुसावळ) अशी आहेत.
त्यांच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा दोन जिवंत काडतूस मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, सपोनि राहुल भंडारे, पोकों राहुल भोई, राहुल बेहेनवाल, दिपक शेवरे व स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल वानखेडे यांनी उल्लेखनीय रित्या पार पाडली.



