जळगाव प्रतिनिधी | शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान नगरातील रामेश्वर कॉलनी येथे राहणारे रामेश्वर चव्हाण हे पत्नी व दीड वर्षीय मुलगा हर्षीत यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी (दि. २७ जून) दुपारच्या सुमारास घरासमोर पाणी सांडल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील जागा ओली झाली होती.
याचवेळी घरासमोर खेळत असलेल्या दीड वर्षीय हर्षीत रामेश्वर चव्हाण याचा ओल्या फरशीवर पाय घसरला आणि तो थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटना लक्षात येताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही मध्यरात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. हर्षीत हा चव्हाण दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. चिमुकल्याच्या अकाली निधनामुळे नातेवाईक, परिसरातील नागरिक आणि परिचितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



