जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील एका २८ वर्षीय विवाहित महिलेवर ओळखीच्या व्यक्तीने अत्याचार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून धरणगाव येथील सुनील मधुकर चौधरी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ व ११५(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीची ओळख फिर्यादीच्या बहिणीच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क वाढला. २४ जून २०२६ रोजी दुपारी जळगाव शहरातील सम्राट पार्क परिसरात फोटो काढण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीला कारमध्ये बसविले. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवत अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादीनुसार, घटनेनंतर आरोपीने तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधून पैशांची मागणी केली. त्यानंतर पीडितेने हा प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. बहिणीच्या मदतीने तिने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन रामनाथ रणशेवरे करीत आहे.



