चोपडा प्रतिनिधी | चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या विरोधात विविध तक्रारींची निष्पक्ष विभागीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करत सोमवारी चोपड्यात सर्वपक्षीय जनआंदोलन करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततापूर्ण मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते तहसील कार्यालयावर पोहोचले. प्रांत अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने नायब तहसीलदार जोशी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनातील मागण्या शासनाकडे तातडीने पाठविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
आंदोलनानंतर झालेल्या सभेत वक्त्यांनी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत कथित अवैध गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष, प्रशासकीय कारभारातील त्रुटी आणि नागरिकांच्या तक्रारींचा उल्लेख केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे तसेच विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले. प्रशासनाने निवेदन स्वीकारल्यानंतर आता शासन आणि महसूल विभाग या मागण्यांवर कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण चोपडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.



