जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथील सरदार वल्लभभाई पटेल चौक परिसरात वसंत मुरलीधर महाजन (वय ६६) यांचे घर आहे. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ११ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कुलूपाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरट्यांनी १० हजार रुपये रोख, पत्नीने कमावून जमा केलेले १५ हजार रुपये रोख, ४० हजार रुपये किमतीचा एक तोळे वजनाचा सोन्याचा टॉप, ६० हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची बेल, ४० हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी आणि ४० हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
या घटनेनंतर महाजन यांनी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.



