जळगाव प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा परिसरात घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून खाजगी वायरमन योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश वाघ हे खाजगी वायरमन म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते. पिंप्राळा परिसरातील एका घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का लागला. या दुर्घटनेत ते गंभीररीत्या बाधित झाले.
घटनेनंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेलेल्या योगेश वाघ यांच्या मृत्यूची बातमी दुपारी समजताच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
योगेश उर्फ भैय्या वाघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठी गर्दी केली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या परिचितांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, काम सुरू असताना नेमक्या कोणत्या परिस्थितीत विजेचा धक्का बसला, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबाने आपला आधार गमावला असून, परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.



