जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून, सर्वांचे लक्ष दिग्गज नेत्यांच्या उमेदवारीकडे लागले आहे. मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या पत्नी, नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे.
आज मंत्री गिरीश महाजन आणि साधनाताई महाजन यांच्या नावाने त्यांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. त्यामुळे महाजन कुटुंब या निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, ३० ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ होण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन आणि नगराध्यक्ष साधनाताई महाजन हे दोघेही उद्या आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांचे कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत विविध राजकीय गटांची ताकद पणाला लागणार आहे. सहकार क्षेत्रातील वर्चस्वासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे कोणते नेते निवडणुकीच्या मैदानात उतरतात, कोणत्या गटांची आघाडी होते आणि अंतिम लढतीचे चित्र कसे स्पष्ट होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



