जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना शिंदे गटाच्या दोन आणि भाजपच्या एका जागेवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असतानाच तीन महत्त्वाच्या जागा बिनविरोध झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पारोळा, एरंडोल आणि भुसावळ सोसायटी मतदारसंघांत प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज दाखल न झाल्याने या तीन जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील, एरंडोलमधून मृणाल अमोल पाटील, तर भुसावळमधून रजनी संजय सावकारे यांची निवड निश्चित झाली आहे.
विशेष म्हणजे, नलिनी पाटील या आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री, तर मृणाल पाटील या त्यांच्या पत्नी आहेत. तसेच रजनी सावकारे या मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या बिनविरोध निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू असतानाच आमदार अमोल पाटील यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी चर्चा करून आपल्या दोन जागा बिनविरोध करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या घडामोडीनंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी, बिनविरोध निवडीची माहिती मिळाल्याने अमोल पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. तर आमदार अमोल पाटील यांनीही मंगेश चव्हाण यांच्या राजकीय कौशल्याचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडा वापर केल्याचे सांगत राजकीय चर्चांना आणखी हवा दिली.
एकीकडे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आणि दुसरीकडे तीन जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आता उर्वरित जागांवर महायुतीचे नेते कोणता तोडगा काढतात आणि अंतिम राजकीय चित्र कसे उभे राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



