जळगाव प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावाच्या पाण्याच्या नियोजनावरून शेतकरी आक्रमक झाले असून पशुधनासाठी चारा पिकांची लागवड करता यावी, यासाठी तलावातून दोन पाणी आवर्तने सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष वाल्मीक जिजाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पादन आलेले नाही. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. चारा टंचाईमुळे शेतकरी चिंतेत असून जनावरांचे संगोपन करणे कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर म्हसवे तलावातून चारा पिकांच्या लागवडीसाठी किमान दहा-दहा दिवसांच्या अंतराने दोन पाणी आवर्तने सोडण्यात यावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या पाण्याचा उपयोग झाल्यास शेतकऱ्यांना चारा पिके घेता येतील आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होईल, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
याशिवाय तलाव परिसरातील तसेच पाटचारीलगतच्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी उचलण्याची सुरू असलेली कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, असे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, प्रशासनाने १० नोव्हेंबरपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पारोळा येथील महामार्गावरील धारागाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यामुळे म्हसवे तलावाच्या पाण्याबाबत जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना कितपत प्रतिसाद देते, याकडे पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



