जळगाव प्रतिनिधी | एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाला शोभेल असा थरारक घटनाक्रम भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियावरील दरोड्याच्या तपासातून समोर येत आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कारागृहातच दरोड्याचा कट आखण्यात आल्याचे समोर येत असल्याने पोलीस यंत्रणेसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शंकर जासक याच्यावर २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ३ कोटी १७ लाख रुपयांचा दरोडा टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कारागृहात असताना त्याची ओळख गजानन राजेंद्र पवार याच्याशी झाली. गजानन पवार हा २०२४ मधील खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. दोघेही काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी आणखी दोन साथीदारांना सोबत घेत भोकर बँक लुटण्याचा कट आखल्याची माहिती आहे.
ठरल्याप्रमाणे चारही संशयित भोकर येथील बँकेत दाखल झाले. छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी मॅनेजर आणि कॅशियरला धमकावले. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून तब्बल १६ लॉकर उघडण्यास भाग पाडले. लॉकरमधील सोने आणि रोकड पाच ते सहा बॅगांमध्ये भरून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तब्बल ४० ते ४५ मिनिटे आरोपी बँकेत होते.
दरम्यान, आरोपी धरणगावच्या दिशेने पसार होत असताना ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. चावलखेड्याजवळ काही बॅगा फेकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या पथकाने शोधमोहीम राबवत चावलखेडा परिसरातील शेतात सापळा रचला. या कारवाईत शंकर जासक आणि गजानन पवार यांच्यासह एकूण चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
आरोपींकडून सुमारे १५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याने भरलेल्या बॅगा जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



