
आगामी सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन अनेक गाड्यांच्या मुदतीत वाढ
जळगाव । रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि आगामी सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन अनेक गाड्यांच्या मुदतीत वाढ केली आहे. यातच आता भुसावळ जळगाव मार्गे धावणाऱ्या बडनेरा ते नाशिक रोड अनारक्षित गाडीसह साईनगर शिर्डी-बिकानेर आणि मुंबई–रिवा या साप्ताहिक गाडीच्या सेवेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बडनेरा–नाशिक रोड-बडनेरा मेमू
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष मेमू गाडी यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. मात्र, आता ही गाडी ०१ मार्च ते १५ जुलै २०२६ या कालावधीत धावणार आहे. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड–बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष ही गाडी देखील १५ जुलै २०२६ धावणार आहे.
बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड रेल्वे स्थानक दरम्यान धावणारी ही विशेष मेमू गाडी जळगाव जिल्ह्यातील बोदवड, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, पाचोरा, कजगाव आणि चाळीसगाव जंक्श्न स्थानकांवर थांबा घेते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला.
बिकानेर-साईनगर शिर्डी गाडी २८ मार्चपर्यंत धावणार
ट्रेन क्रमांक ०४७१५ बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी आता २८ मार्च २०२६ पर्यंत दर शनिवारी धावणार आहे. यापूर्वी ही गाडी केवळ २८ फेब्रुवारी पर्यंत अधिसूचित होती. तसेच, परतीसाठी ट्रेन क्रमांक ०४७१६ साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष गाडी आता २९ मार्च २०२६ पर्यंत दर रविवारी चालवण्यात येईल. विशेष राजस्थानमधील खाटुश्याम दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना या गाडीचा फायदा होणार आहे. या गाडीला खाटुश्याम जवळील रिंगस या रेल्वे स्टेशनला थांबा आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
या गाड्यांना दोन्ही बाजुने मनमाडसह भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगढ, फतेहपूर शेखावाटी, चुरू, रतनगढ, राजलदेसर आणि श्री डूंगरगढ, अशा प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
मुंबई–रिवा गाडीलाही मुदतवाढ
मुंबई–रिवा दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवांना मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२१८८ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–रिवा विशेष ही दर शुक्रवारी धावणारी गाडी २७ फेब्रुवारी ते २६ जून २०२६ या कालावधीत एकूण १७ सेवांसाठी वाढविण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक०२१८७ रिवा–मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ही दर गुरुवारी धावणारी गाडी २६ फेब्रुवारी ते २५ जून २०२६ या कालावधीत १७ फेऱ्यांसाठी सुरू राहणार आहे.
या विशेष गाड्यांना दोन्ही दिशेने इगतपुरी, नाशिक रोड,, मनमाड, जळगाव, भुसावळ आणि खंडवा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना थेट मुंबई–रिवा जोडणी मिळणार आहे.


