
वाहतूक कोंडीतून जळगावकरांना दिलासा मिळण्याची आशा
तरसोद ते पाळधी बायपासमुळे जळगाव शहरातील अवजडसह हलक्या वाहनांची वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी दिसून येते. यामुळे शहरातूनच जाणारी अवजड व लांब पल्ल्याची वाहतूक ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशातच शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शहराभोवती रिंग रोड उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे.

या संदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन प्रस्तावाला तातडीने मंजुरी तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. रिंग रोड उभारल्यास शहरातील वाहतूक बाहेरूनच वळवता येईल, रस्ते सुरक्षेत वाढ होऊन अपघातांचे प्रमाण घटेल तसेच औद्योगिक, लॉजिस्टिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल.
प्रस्तावित रिंग रोड हा राष्ट्रीय महामार्ग एनच ५३ सूरत–नागपूर, एनएच ७५३ एफ जळगाव–छत्रपती संभाजीनगर आणि एनएच ७५ जे जळगाव–चाळीसगाव-मनमाड, या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
हा प्रस्तावित रिंग रोड जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला छेदणार असल्यामुळे आपोआपच जळगाव शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून छत्रपती संभाजीनगरमार्गे मुंबई-नागपूर समृद्धी मगामार्गाकडे सहजपणे जाता येणार आहे. त्यासाठी शहरातील वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे जळगाव विमानतळाकडे जाणारे कमी अंतराचे पर्याय मार्ग वाहतुकीसाठी खुले होतील.


