
जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
जळगाव । जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता जळगाव जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी आणि काळाबाजाराच्या तक्रारी वाढू नयेत यासाठी जिल्ह्यात विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार या पथकाची स्थापना करण्यात आली. या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे सेल्स अधिकारी तसेच निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचा समावेश आहे.
भरारी पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी अचानक तपासण्या करून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर, साठेबाजी किंवा अवैध विक्री होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार आहे. त्यामुळे गॅस वितरण व्यवस्थेवर प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांना नियमित आणि सुरळीत गॅस पुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रारी असल्यास 0257-2223180 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


