
केंद्र सरकारचा रेशनबाबत महत्त्वाचा निर्णय; राज्यांना दिल्या सूचना?
जळगाव । तुम्हीही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने मोफत धान्य वितरण योजनेसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात जून २०२६ पर्यंत ३ महिन्याचे वितरित होणारे तांदूळ आणि गहू केंद्रीय साठ्यातून आगाऊ उचलून नागरिकांपर्यंत तातडीने पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्यांच्या अन्न सचिवांना पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे.
केंद्राच्या पत्रानुसार, आगामी गहू खरेदी हंगाम सुरू होणार असल्यामुळे गोदामांवर ताण येऊ नये यासाठी राज्यांनी नियोजित वाटपातील धान्य लवकर उचलावे. साठवणूक क्षमता आणि वाहतूक व्यवस्थेवरील दबाव लक्षात घेऊन लाभार्थ्यांपर्यंत धान्य त्वरित पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी गोदामांमध्ये नव्याने खरेदी होणाऱ्या धान्यासाठी जागा उपलब्ध होईल.
या प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनाही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारांशी समन्वय साधून आवश्यक तेवढा धान्यसाठा गोदामांमध्ये उपलब्ध राहील याची खात्री करण्यास सांगितले आहे. तसेच नवीन धान्य खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.हा निर्णय National Food Security Act अंतर्गत घेण्यात आला.
अधिकार्यांच्या माहितीनुसार, सध्या एफसीआयकडे ३७.२ दशलक्ष टन तांदूळ आणि २३.५ दशलक्ष टन गहू उपलब्ध आहे, जो सामान्य साठ्यापेक्षा १८५% जास्त आहे. यामुळे या धान्याचा फायदा ८० कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना होणार आहे. या धोरणामुळे राज्यातील लाभार्थ्यांना नियमित आणि सुरक्षित रेशन वितरणाची खात्री मिळणार आहे, तर केंद्रातील साठा व्यवस्थापनही सुचारू राहणार आहे.


