
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मृत्यू झाल्याची घटना
एरंडोल : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सावखेडा–मराठखेडा (ता. पारोळा) गावाजवळ मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत जवळपास एक ते दीड वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून सावखेडा–मराठखेडा परिसरासह एरंडोल तालुक्यातील जळू, पातरखेडा, भालगाव, नांदगाव आदी गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच सावखेडा–मराठखेड्याचे पोलीस पाटील संतोष पुंडलिक पाटील यांनी तात्काळ एरंडोल वनपरिक्षेत्र कार्यालयाला दूरध्वनीद्वारे कळविले. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित, वनपाल देविदास जाधव, वनपाल सतीश ठेलार यांच्यासह वनविभागाचे पथक सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी, पारोळा यांनी जागेवरच मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय, एरंडोलच्या आवारात मृत बिबट्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. मृत बिबट्या सुमारे एक ते दीड वर्षांचा मादी असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, बिबट्या एका रात्रीत साधारणतः २० ते ३० किलोमीटरपर्यंत भ्रमण करतो, अशी माहिती वनपरिक्षेत्र कार्यालयातील सूत्रांनी दिली. त्यामुळे महामार्गालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेता वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.


