
जळगाव । देशात सर्वसामान्य महागाई कमी होण्याची अपेक्षा करीत असताना आता आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या
संघर्षाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे.अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आयात – निर्यात विस्कळीत झाली असून यामुळे खाद्यतेलाच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो तब्बल १३ ते १८ रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून, ऐन सणासुदीच्या तोंडावर ही वाढ अधिकच जाणवू लागली आहे. फेब्रुवारी अखेरीस १६० रुपये असलेले सूर्यफूल तेल आता १७३ रुपयांवर पोहोचले आहे. घाऊक बाजारातही १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली असून, पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खाद्यतेलाचा प्रकार आणि अंदाजे किंमत (प्रति लिटर/किलो)
सूर्यफूल तेल (Sunflower Oil)- ₹१७३ – ₹१७८
सोयाबीन तेल (Soybean Oil) – ₹१५३ – ₹१५९
शेंगदाणा तेल (Groundnut Oil) – ₹१९० – ₹१९४
पाम तेल (Palm Oil)- ₹१४५ – ₹१४८
मोहरी तेल (Mustard Oil) – ₹२०० – ₹२०४
दरम्यान, फेब्रुवारीत २.१३ टक्क्यांवर पोहोचला असून, ही ११ महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. अन्न व बिगर-अन्न वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाईचा दबाव कायम आहे.गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातच कोकणातील हापूस आंब्याची कमी आवक, बासमती तांदूळ आणि साबुदाण्याच्या वाढत्या किमती यामुळे सण साजरा करणे यंदा अधिक खर्चिक ठरणार आहे. तज्ञांच्या मते, युद्धामुळे वाढलेले क्रूड ऑईल दर, लॉजिस्टिक अडथळे आणि आयात साखळीतील विस्कळीतपणा हे दरवाढीमागील प्रमुख कारणे आहेत. एकूणच, जागतिक घडामोडींचा थेट परिणाम आता भारतीय बाजारपेठ आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


