जळगाव प्रतिनिधी | “बुद्धिमान आणि संस्कारशील युवक ही देशाची खरी संपत्ती आहे. धर्माचे कार्य करताना शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा करणारा तरुण घडावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे,” असे प्रतिपादन परमपूज्य जनार्दन महाराज यांनी केले.
नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या खानदेश स्तरीय प्रवेश परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
स्पर्धा परीक्षांचे मिळणार मोफत धडे :
या उपक्रमांतर्गत ५० पेक्षा अधिक निवडक विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, JEE आणि NEET या परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था देखील पूर्णपणे मोफत असणार आहे. या निवडीसाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा तीन केंद्रांवर प्रवेश परीक्षा पार पडली, ज्यात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
मान्यवरांची उपस्थिती :
या कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, शिक्षणाधिकारी निलेश पाटील, नगरसेवक नरेंद्र पाटील, ग्लोबल मिशन स्कूलचे चेअरमन मनोहर पाटील आणि नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रश्नपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.
समाज आणि शासन स्तरावर कौतुक :
आमदार राजूमामा भोळे यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना म्हटले की, “हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यासाठी दिशादर्शक असून, या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.” शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप पाटील यांनी केले, तर आभार रमेश पाटील यांनी मानले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पाटील, अक्षय देवरे, विवेक साळुंखे यांच्यासह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.



