मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका महिलेचा विनयभंग करून तिला, तसेच तिच्या पती आणि मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह करते. रविवारी, २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गावातीलच संशयित आरोपी राजेश संभाजी मोंढे आणि किरण संभाजी मोंढे या दोघांनी पीडित महिलेला गाठले. कोणत्याही ठोस कारणाशिवाय या आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली आणि तिचा विनयभंग केला. इतकेच नाही, तर महिलेच्या मदतीला धावून आलेल्या तिच्या पतीला आणि मुलालाही या आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कुटुंबातील सदस्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पीडित कुटुंबाने तातडीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी, २७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास राजेश मोंढे आणि किरण मोंढे या दोघांविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



