बोदवड प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील येवती येथे सिमेंट काँक्रीटच्या कामावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड तालुक्यातील येवती गावात २४ एप्रिल रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास सिमेंट काँक्रीटचे काम सुरू होते. तक्रारदार योगेश युवराज माळी (वय २५, रा. येवती) यांनी या कामाबाबत संबंधित व्यक्तींकडे विचारणा केली होती. याच कारणावरून आरोपींना राग अनावर झाला आणि त्यांनी संगनमत करून योगेश माळी यांना लोखंडी रॉड आणि काठ्यांच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत ‘जीव मारून टाकण्याची’ धमकीही दिली.
या घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणात प्रमोद वामन धामोडे, गुलाबखान पठाण, एजाजखान बुदनखान, शेख जाकीर, तौफिक शेख आणि तौसिक शेख (सर्व रा. येवती) या सहा जणांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी बीएनएस (BNS) च्या विविध कलमांनुसार (कलम ११८(१), १८९(१), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ११५(४), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२) गुन्हा नोंदवला आहे.
सध्या बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शशिकांत शिवराम महाले हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विकासकामाबाबत विचारणा केली असता थेट जीवघेणा हल्ला झाल्याने येवती परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



