जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनिपेठ आणि आसोदा रोड परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पोलिसांच्या गस्ती पथकाला गुंगारा देत एका रात्रीत दोन दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास एका लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने हे धाडस केले. विशेष म्हणजे, शहरातील भिलपुरा पोलिस चौकीपासून अवघ्या ५० फुटांच्या अंतरावर असलेले ‘पद्मालया मेडिकल’ चोरट्यांनी लक्ष्य केले. गस्तीवर असलेले पोलिस पथक तेथून पुढे जाताच, चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. दुकानातील ५ ते ८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. एवढेच नव्हे, तर आपल्या कृत्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा ‘डीव्हीआर’ देखील पळवून नेला.
यानंतर हीच टोळी आसोदा रोडवर पोहोचली आणि तेथील एका हार्डवेअर दुकानाचे शटर तोडून ५ हजारांची रोकड चोरली. मात्र, या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. परिसरातील नागरिकांना चाहूल लागताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. काही नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरटे कारसह पसार होण्यात यशस्वी झाले.
या घटनेमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, शनिपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. लाल रंगाच्या कारवरून चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून वेगाने केले जात आहे. लवकरच या टोळीला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.



