जळगाव प्रतिनिधी । फैजपूर आणि वरणगाव परिसरातील गॅस एजन्सी गोडावून फोडून सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १०० तर वरणगाव हद्दीतून ५७ गॅस सिलेंडर चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, घटनास्थळावरील पुरावे आणि संशयित वाहनांचा मागोवा घेत पोलिसांनी शेख बिलाल शेख नबी, वसीम खान शाबीर खान आणि चेतन सुरेश काळे या तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी ६२ भरलेले आणि ९५ रिकामे गॅस सिलेंडर तसेच गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन मोपेड जप्त केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे सिलेंडर चोरीच्या मालिकेला आळा बसला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद आणि विनोद गाभणे अधिक तपास करत आहेत.



