अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील तांदळी येथे बुलेटच्या आवाजावरून झालेल्या वादातून मध्यरात्री भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील सदस्यांना मारहाण आणि घराची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी पहाटे १:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मनीषा रघुनाथ मांग यांचा मुलगा मयूर हा बुलेट घेऊन जात असताना आरोपींनी गाडीच्या आवाजावरून त्याला अडवून वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी मयूरला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी फिर्यादी मनीषा आणि त्यांचे पती मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांच्यावरही तुटून पडले.
आरोपींनी केवळ मारहाण करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी मनीषा घराच्या अंगणात उभ्या असलेल्या बोलेरो गाडीची काच फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून नुकसान झाले तर त्यांना जीवेठार मारण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी पोलिसांनी राज गुलाब शिरसाठ, संदीप हरचंद शिरसाठ, सोनल्या बापू शिरसाठ आणि सौरभ वसंत शिरसाठ यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच मारवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार संजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सध्या या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करत आहेत.



