जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव बसस्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून आणि त्यांना दैवी भीती दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, २० एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास गजानन विठोबा सजेराव (वय ६५) हे जळगाव बसस्थानकावर असताना, एका इसमाने त्यांना शेगावच्या बसबद्दल विचारून बोलण्यात गुंतवले. त्याच वेळी त्याच्या दुसऱ्या साथीदाराने एक खडा (दगड) आणला आणि हातचलाखी करून त्याचे ‘रुद्राक्ष’ मध्ये रूपांतर केल्याचे भासवले. आरोपींनी फिर्यादींना “तुमच्यावर शनिदोष आहे” अशी भीती घातली आणि तो दोष काढण्याच्या बहाण्याने बसस्थानकातील एका कोपऱ्यात नेले. तिथे फिर्यादींच्या हातातील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम काढून घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल पडताळणी केल्यानंतर, आरोपी हे नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. नगरदेवळा) आणि मोहसीन जब्बार मदारी (वय ३१, रा. चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, या गुन्ह्यात त्यांचा तिसरा साथीदार सद्दाम मदारी हादेखील सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.



