रावेर प्रतिनिधी | तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज नवनवीन चोरीच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री शहरातील अष्टविनायक नगर भागात असाच एक थरार पाहायला मिळाला. हत्यारधारी चोरट्यांचा पाठलाग करताना शरद राजपूत हा युवक पडल्याने गंभीर जखमी झाला असून, त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
शहरातील जुना सावदा रोड, सौभाग्यनगर, तिरुपती नगर आणि पीपल्स बँक कॉलनी या भागांत चोरट्यांनी सध्या आपले लक्ष केंद्रित केले आहे. शुक्रवारी रात्री साधारण २:५० वाजेच्या सुमारास एका महिलेला संशयास्पद हालचाल दिसली. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना फोन करून सावध केले. शेजाऱ्यांनी शरद राजपूत यांना माहिती देताच, त्यांनी आपला मुलगा आणि शेजारी प्रमोद राजपूत, कृष्णा पाटील व न.पा. कर्मचारी जतीन यांच्यासह परिसरात शोध सुरू केला.
एका घराच्या कंपाउंडमध्ये दबा धरून बसलेला संशयित दिसताच शरद राजपूत यांनी बॅटरीच्या साहाय्याने पाहणी केली. तिथे चार चोरटे घराच्या सुरक्षा दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होते. आरडाओरड झाल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला.
चोरट्यांच्या मागे धावत असताना वाटेत दगडाला पाय अडकून शरद राजपूत खाली पडले. या अपघातात त्यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले. मात्र, हाताला गंभीर दुखापत झालेली असतानाही त्यांनी जिद्दीने चोरट्यांचा पाठलाग सुरू ठेवला. चोरट्यांनी सावदा नाक्याकडे लावलेल्या मोटारसायकलींवर बसून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.
शरद राजपूत यांनी यापूर्वीही अनेकदा गुन्हेगारांना पकडून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
बस स्टँडवर बॅग चोरून पळणाऱ्या चोरट्याला त्यांनी पकडून दिले होते. साई मंदिरातील चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला पकडल्यानंतर तब्बल ११ गुन्हे उघडकीस आले होते.
या धाडसी कामगिरीबद्दल तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले आहे. शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.



