जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा येथे पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या सचिता दीपक बोरसे या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडलेल्या अमानवीय प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी प्रचा येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण मोहिमेदरम्यान सचिताला पोलिओ डोस आणि लस देण्यात आली. त्यानंतर काही मिनिटांतच तिची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सचिताचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यात अयोध्या येथे कार्यरत आहेत.
यानंतर बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. मात्र रात्री उशिरापर्यंत रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आजोबा तुळशीदास मराठे यांना नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन विभागाबाहेर रात्र काढावी लागली. पहाटे हा हृदयद्रावक प्रकार समोर आल्यानंतर उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आले.
“शवविच्छेदन रात्री करू नका, पण किमान मृतदेह शवपेटीत ठेवायला हवा होता,” अशी वेदनादायक प्रतिक्रिया आजोबांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलिओ डोस देणाऱ्या यंत्रणेची तसेच रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.



