फैजपूर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोरखेडा खुर्द गावात एका महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची आणि त्यानंतर जाब विचारणाऱ्या तिच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी चार संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ९ मे रोजी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी गावाबाहेर गेली असताना, गावातीलच संशयित आरोपी रोशन खलील तडवी याने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. या घटनेनंतर काही दिवसांनी, म्हणजेच ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका लग्नाच्या पंगतीत संबंधित आरोपीने पिडीत महिलेच्या दिराला विनाकारण शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा जाब विचारण्यासाठी जेव्हा पिडीत महिलेचे पती, सासरचे आणि दीर गेले, तेव्हा आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
या वादात लाकडी काठीचा वापर करून चुलत दिराच्या डोक्यावर गंभीर वार केला, ज्यात ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी रोशन खलील तडवी, अफशान खलील तडवी, मिना खलील तडवी आणि खलील सरदार तडवी याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



