पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासमपुरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी मद्यधुंद अवस्थेत एका कुटुंबावर हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासमपुरा येथील रहिवासी फिर्यादी शंकरदास हिरादास बैरागी (वय ५८) हे १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावर बसलेले असताना ही घटना घडली. याच भागातील आरोपी अमोल लक्ष्मण चरावंडे आणि राधाबाई लक्ष्मण चरावंडे यांनी दारूच्या नशेत जुन्या भांडणाची कुरापत काढत शंकरदार बैरागी यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
संशयित आरोपी अमोल याने रागाच्या भरात फिर्यादीच्या घराच्या दिशेने बीअरची काचेची बाटली फेकून मारली. त्यानंतर दोघांनी रस्त्यावर पडलेले दगड आणि विटा उचलून शंकरदार यांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर शंकरदार यांची सून त्यांना समजवण्यासाठी बाहेर आली, तेव्हा त्यांनी अश्लिल शिवीगाळ केली. या दगडफेकीत फिर्यादीच्या घराचे दरवाजे, खिडक्या आणि घराबाहेरील इलेक्ट्रिक मीटरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी शंकरदास बैरागी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



