भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहरातील ताजनगर भागात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, बाजारपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात मोठी खळबळजनक उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत दरेकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गुरुवारी १४ मे रोजी भुसावळ येथील ताजनगर भागातील एका घरात काही इसम विक्रीसाठी गांजा बाळगून आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ताजनगरमधील शाळा क्रमांक ३ जवळील तडवी वाडा परिसरात सापळा रचला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
जप्त केलेला मुद्देमाल:
पोलिसांनी केलेल्या छाप्यात आरोपींच्या ताब्यातून एकूण ४ लाख ३९ हजार ४४० रुपये किमतीचा २१ किलो ९७२ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा जप्त केला. हा गांजा ‘PARAG AGRO’ असे लिहिलेल्या दोन गोण्यांमध्ये भरून ठेवलेला होता.
आरोपींची नावे:
या कारवाईत पोलिसांनी शेख अज्जीज अब्दुल मजीद उर्फ अच्छू (वय ४१, रा. भुसावळ), सलीम मजीद शेख (वय ४५, रा. भुसावळ), अनस (पूर्ण नाव माहीत नाही, रा. भोपाळ) आणि आदिल खान (रा. अकोला) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.



