पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरातील जय भवानी मॉलजवळ एका ४६ वर्षीय शिक्षिकेच्या गळ्यातील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी पोत (मंगळसूत्र) अज्ञात चोरट्याने जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली योगेश मोरे (वय ४६, रा. चिंतामणी कॉलनी, पाचोरा, जि. जळगाव) या पेशाने शिक्षिका आहेत. त्या आपल्या बहिणीसह संसारोपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी भडगाव रोडवरील जय भवानी मॉलमध्ये गेल्या होत्या. रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास खरेदी करून त्या पायी घरी परतत असताना, रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने परिसरात मोठा अंधार होता.
या अंधाराचा फायदा घेत अंदाजे ४० वर्षे वयाचा, मजबूत शरीराचा एक अज्ञात इसम मागून आला. त्याने फिर्यादी मोरे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी पोत जोराने ओढून काढली. महिलांनी तातडीने ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा करत चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूला लोक जमा होण्यापूर्वीच चोरट्याने थोड्या अंतरावर उभी करून ठेवलेली आपली मोटार सायकल स्टार्ट केली आणि तो अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत आहे.



