जळगाव प्रतिनिधी जळगाव एसटी बसस्थानक परिसरातील बंद असलेले उपहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे आज एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात प्रवाशांना सवलतीच्या दरात चहा-नाश्ता सुविधा उपलब्ध होत नसल्याने होत असलेल्या गैरसोयींकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच राज्यातील इतर बसस्थानकांवर सुविधा सुरू असताना जळगाव बसस्थानक मात्र अद्याप वंचित का ठेवण्यात आले आहे? असा सवालही उपस्थित करण्यात आला.
उपहारगृह सुरू करण्यासाठी आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध असूनही प्रशासनाकडून होत असलेला विलंब संशयास्पद असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत का? अशी शंकाही व्यक्त करण्यात आली.
याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान, जर लवकरात लवकर उपहारगृह सुरू करण्याचा निर्णय झाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः एसटी बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात चहा-नाश्ता उपलब्ध करून देईल, असा स्पष्ट इशाराही विभाग नियंत्रकांना देण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, संदीप मांडोळे,राहुल चव्हाण.राजेश मराठे, विकास पात्रे, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल्ल, यांच्या सह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते,



