जळगाव प्रतिनिधी । अवैध सावकारीच्या चौकशीत अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि तक्रारदारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहकार विभागाच्या वर्ग-१ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
जगदीश बाबुराव बारी (वय ५६, उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्या सांगण्यावरून दीड लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणारा खाजगी इसम देविदास धनसिंग पाटील (वय ४४, मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन) यालाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्यावर अवैध सावकारीच्या अनुषंगाने उपनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणात आपल्या व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये आणि चौकशी अहवाल बाजूने लागावा, यासाठी तक्रारदाराने जगदीश बारी यांची भेट घेतली. तेव्हा बारी याने सुरुवातीला ५ लाख रुपयांची मागणी केली, जी तडजोडीअंती ३ लाख रुपयांवर ठरली. पडताळणी दरम्यान, “मागील वेळी तुम्ही वकील लावून माझे मोठे नुकसान केले, त्यामुळे मी नकारात्मक अहवाल दिला होता. पण आता पैसे दिले तर अनुकूल अहवाल पाठवतो,” असे बारी याने उघडपणे सांगितले.
लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ मे रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार २० मे रोजी बी.जे. मार्केटमधील जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. लाचेचा पहिला हप्ता म्हणून दीड लाख रूपये स्वीकारताना देविदास पाटील याला पथकाने रंगेहात अटक केली. ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उप अधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या पथकाने केली.



