जळगाव प्रतिनिधी | शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून अचानक निघून गेलेल्या एका ६८ वर्षीय वृद्धेचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंधूबाई भिला चौधरी (वय ६८, रा. जुने जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवार २० मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधूबाई चौधरी या जुने जळगाव परिसरातील पांझरापोळ टाकीजवळ आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होत्या. बुधवारी सकाळच्या सुमारास त्या कोणालाही काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेल्या होत्या. त्या बऱ्याच वेळानंतरही घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांची चिंता व्यक्त केली आणि सर्वत्र शोध सुरू केला. नातेवाईक आणि परिचित लोकांकडे विचारपूस करूनही त्यांचा कुठेच पत्ता लागत नव्हता.
गणेश घाटाजवळ मृतदेह तरंगताना आढळला :
कुटुंबिय शोध घेत असतानाच, दुपारच्या सुमारास मेहरुण तलावातील गणेश घाटाजवळ एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. नागरिकांनी तात्काळ ‘डायल ११२’ वर कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
कुटुंबियांचा आक्रोश :
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यादरम्यान शोध घेत असलेले सिंधूबाईंचे नातेवाईकही मेहरुण तलावावर पोहोचले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो सिंधूबाईंचाच असल्याचे स्पष्ट झाले. सिंधूबाईंची ओळख पटताच कुटुंबियांनी घटनास्थळीच एकच आक्रोश केला, ज्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले.
त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. तेथे डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. मयत सिंधूबाई यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे आणि जावई असा मोठा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.



