जळगाव प्रतिनिधी | भावाला जिवंत मारण्याची धमकी देऊन एका १८ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरा मच्छी मार्केट भागातील रहिवासी असलेल्या शाकीब अस्लम पटेल (वय २०) याने पीडित तरुणीला तिच्या भावाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. या भितीचा गैरफायदा घेऊन आरोपीने १ नोव्हेंबर २०२५ ते २० मे २०२६ या कालावधीत पीडितेला तिच्या राहत्या घरी वेळोवेळी बोलावून घेतले. तिच्या संमतीविना आणि विरोधाला न जुमानता आरोपीने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
या अत्याचारादरम्यान पीडित तरुणी गर्भवती राहिली. ही बाब समोर आल्यानंतर आरोपी शाकीब याने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या आणि त्या खाण्यास जबरदस्तीने भाग पाडले, अशी तक्रार पीडितेने पोलिसांत दिली आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी २१ मे रोजी रात्री आरोपी शाकीब अस्लम पटेल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.



