जळगाव प्रतिनिधी | रुग्णसेवेत दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), जळगाव येथे एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ (MARD) आणि ‘जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी डॉक्टर आणि इंटर्न्ससाठी १८ मे ते २२ मे दरम्यान मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला डॉक्टरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १०० हून अधिक निवासी डॉक्टर आणि इंटर्न यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना डॉक्टरांचा रुग्ण, त्यांचे रक्त आणि इतर शारीरिक द्रव्यांशी सतत संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना ‘हेपेटायटिस-बी’ सारख्या घातक संसर्गाचा धोका सर्वसामान्यांपेक्षा अधिक असतो. हीच मोठी जोखीम लक्षात घेऊन डॉक्टरांना आरोग्य सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर तसेच जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बाविस्कर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी “निवासी डॉक्टर आणि इंटर्नच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. अशा प्रतिबंधात्मक उपक्रमांमुळे डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करण्याचे बळ मिळते,” अशा शब्दांत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी ‘मार्ड’च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या यशस्वी मोहिमेचे आयोजन ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. आदित्य बिहानी, उपाध्यक्ष डॉ. उत्कर्ष वशिष्ठ, सरचिटणीस डॉ. यशश्री चौधरी आणि डॉ. प्रमय व्यास यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. तसेच लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यात परिसेविका सुलभा नाईक, अधिसेविका संगिता शिंदे आणि सहाय्यक अधिसेवक तुषार पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले. आगामी काळातही डॉक्टरांच्या हितासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ‘मार्ड’चे प्रवक्ते डॉ. यश सिसोदे आणि डॉ. प्रियंका गुंटुकुला यांनी दिली.



