जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात प्लास्टिक बंदीचे आदेश असूनही गेल्या काही दिवसांपासून सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत जळगाव शहर महानगर पालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी २६ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता जळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत अचानक धडक तपासणी मोहीम राबवली. महापौरांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण बाजारपेठेत प्रचंड खळबळ उडाली.
महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः शहरातील राजकमल टॉकीज परिसर, तिजोरी गल्ली, अशोक टॉकीज गल्ली, दाणा बाजार, नेताजी सुभाषचंद्र चौक आणि फुले मार्केट या गजबजलेल्या भागांमध्ये पायी गस्त घालत प्लास्टिक पिशव्यांची पाहणी केली. महापौर अचानक आल्याचे पाहताच फळ-भाजी विक्रेते, दुकानदार आणि हॉकर्सची एकच पळापळ झाली. अनेकांनी प्लास्टिकचे साठे लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले.
कारवाईदरम्यान काही दुकानांमध्ये नियमबाह्य प्लास्टिक आढळल्याने महापौर चांगल्याच संतापल्या. “तुम्ही वस्तू कशामध्ये पॅक करून ग्राहकांना देतात?” असा संतप्त सवाल त्यांनी विक्रेत्यांना केला. या मोहिमेत जवाहर क्लोथ स्टोअर्स आणि एच. आर. ट्रेडर्स या सराईत दुकानदारांवर तिसऱ्यांदा कारवाई करत प्रत्येकी १० हजार रुपयांचा, म्हणजेच एकूण २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. “यापुढे प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास दुकान थेट ‘सील’ केले जाईल,” असा कडक इशारा महापौरांनी दिला.
दुसरीकडे, नियम पाळत ‘इको-फ्रेंडली’ बायोग्रेडेबल थैल्या वापरणाऱ्या जागरूक व्यापाऱ्यांचे महापौरांनी कौतुक केले. नागरिकांनीही घराबाहेर पडताना कापडी पिशव्या सोबत बाळगाव्या, असे आवाहन त्यांनी केले. या कारवाईत नगरसेवक रमेश मतानी, मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, रुपेश भालेराव, स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर आणि मयूर सपकाळे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.



