जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गिरणा टाकी परिसरात अवैधपणे मोठ्या प्रमाणावर सट्टा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. “ही सट्टा पेढी नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा संतप्त सवाल आता परिसरातील सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेरे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उघड्यावर दारू पिणारे, अवैध वाळू वाहतूक, गोवंश व गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करून धडक कारवाई केली जात आहे. पोलीस अधीक्षकांच्या या सिंघम स्टाईल कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
मात्र, असे असतानाही रामानंदनगर परिसरातील किलबिल शाळेपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर, गिरणा टाकीजवळ टपऱ्यांच्या आडोशाला हा सट्ट्याचा काळा बाजार बिनधास्तपणे सुरू आहे. शैक्षणिक संस्थेच्या एवढ्या जवळ जुगाराचा अड्डा चालत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
एकीकडे सुशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार नसताना, दुसरीकडे शहरात अशा प्रकारे अवैध धंदे फोफावत आहेत. यामुळे तरुण पिढी वाममार्गाला लागून व्यसनाच्या गर्तेत अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. या सट्टा पेढीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असून, पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून या अड्ड्याचा कायमचा बिमोड करावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



