मुक्ताईनगर प्रतिनिधी | मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत आणि आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या एका वाहनाच्या अपघातामुळे या आंतरजिल्हा गुन्हेगारांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलावर एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाला होता. याच दरम्यान परिसरात गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर पोलिसांच्या सेकंड मोबाईल पथकाने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांचे वाहन येताना पाहताच स्कॉर्पिओ चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या एकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून धूम ठोकली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनातील उर्वरित दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
संशय बळावल्याने पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहनाची बारकाईने झडती घेतली. या झडतीदरम्यान पोलिसांना वाहनात एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड, दोरी, दोन मोबाईल फोन आणि एक बनावट नंबर प्लेट आढळून आली. हे सर्व साहित्य जप्त करत पोलिसांनी चंद्रकांत विष्णू वाघ आणि कैलास कारभारी घोडके या दोघांना अटक केली.
फरार मुख्य आरोपीवर १८ गंभीर गुन्हे :
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, फरार झालेला वाहन चालक हा प्रशांत ऊर्फ परशुराम गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशांत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बीड, अहिल्यानगर, बुलढाणा, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये खून, दरोडा, वाहन चोरी यांसारखे तब्बल १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.



