चोपडा प्रतिनिधी | चोपडा शहर पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापाराविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. शहरातील तहसील कार्यालय आणि प्रताप हायस्कूलच्या मागील भागात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ५ पीडित महिलांची सुटका केली असून दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित ९ फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २९ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका ठिकाणावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि आश्रय देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे तपासात समोर आले. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिला राजस्थान आणि नेपाळ येथील रहिवासी असून, त्यांना सुरक्षित स्थानी हलवून कायदेशीर संरक्षण व मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शिल्पा राजू लामा (वय ३५) आणि पूजा टीकाराम थापा (वय २९) यांना अटक केली आहे. तर शिवाजी पाटील, फरीद शेख, शाहबद खान, शरिफ तडवी, सुरेंद्र राजपूत यांच्यासह अन्य फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
शहरात अशा प्रकारे महिलांचे शोषण आणि मानवी तस्करी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी अशा संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन चोपडा पोलिसांनी केले आहे.



