जळगाव प्रतिनिधी | शिरसोली परिसरातील शशी वाणी यांच्या गोदामासमोरील सार्वजनिक जागेत जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर कुऱ्हाड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात वसीम फारुख खाटीक हा तरुण गंभीर जखमी झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचानगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरसोली येथील रहिवासी फारुख हुसेन खाटीक (वय ५०) यांचा मुलगा वसीम हा गोदामाजवळ असताना हा प्रकार घडला. पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून आरोपी फैजल रज्जाक शेख (रा. शिरसोली) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अज्ञात इसमाने वसीमला गाठले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
संशयित आरोपी फैजल रज्जाक शेख याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वसीमच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या अज्ञात इसमाने हातातील चाकूने वसीमच्या हातावर आणि चेहऱ्यावर सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या गंभीर हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी जखमी वसीमचे वडील फारुख हुसेन खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



