भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहर परिसरात घडलेल्या एका गंभीर खुनाच्या प्रकरणातील ०३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीला कोणत्याही कारणाशिवाय बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी रॉड आणि चॉपरने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली होती. तसेच फिर्यादीच्या पत्नीला गावठी कट्टा दाखवून, “कोणाला फोन केला तर गोळी घालीन,” अशी धमकीही देण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना तातडीने तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुषंगाने पोलिसांचे वेगवेगळे शोध पथक तयार करण्यात आले होते.
तपास पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे भुसावळ येथील वाल्मिक नगर भागातून आरोपी कुंदन अनिल पठारे (वय १९), रोहित उर्फ दादू संजय नवगिरे (वय २१) आणि एका विधीसंघर्षित बालकाला (नाबालिग) ताब्यात घेतले.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करत आहेत.



