जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या मोफत सुरक्षा संच वाटपामध्ये लाचेची मागणी करणाऱ्या एका २० वर्षीय खाजगी महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. भाग्यश्री विजय पाटील (रा. सामनेर, ता. पाचोरा) असे लाच घेणाऱ्या खाजगी तरुणीचे नाव असून, तिच्याविरुद्ध जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान घटनास्थळावरून एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव येथील एका मूळ तक्रारदाराने ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ’ यांच्या योजनेंतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. हा संच घेण्यासाठी त्यांना वावडदा (ता. जि. जळगाव) येथील केंद्रावर उपस्थित राहण्याचे पत्र मिळाले होते. तक्रारदार ४ जून रोजी संच घेण्यासाठी गेले असता, केंद्रावरील कर्मचारी भाग्यश्री पाटील हिने ‘केवायसी’ करण्यासाठी दोन फॉर्म्स विकत घ्यावे लागतील असे सांगून १०० रुपयांची लाच मागितली.
वास्तविक पाहता, शासनाच्या नियमांनुसार हा संच लाभार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य देणे बंधनकारक आहे. लाचेची मागणी झाल्यामुळे सजग तक्रारदाराने तत्काळ जळगाव एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत खंडू नागरे आणि पथकाने वावडदा येथील केंद्रावर यशस्वी सापळा रचला.
पंचांसमक्ष १०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना भाग्यश्री पाटील हिला ताब्यात घेण्यात आले. एसीबीच्या पथकाने घटनास्थळाची झडती घेतली असता, तेथे १३ हजार ६७० रुपये आणि झेरॉक्स मशीनजवळील स्टीलच्या डब्यामध्ये १३ हजार १०० रुपये अशी एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम लाभार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे वसूल केल्याचा संशय आहे. ही धडक कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.



