धरणगाव प्रतिनिधी | शहरातील मातोश्री कॉम्प्लेक्ससमोरील सार्वजनिक जागेवर एका वृद्ध व्यापाऱ्याला अडवून तीन अज्ञात इसमांनी ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भगवान आत्माराम माळी (वय ६२, रा, धरणगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. ४ जून रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास ते मातोश्री कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावरून जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांना गाठले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी भगवान माळी यांच्या हातातील लाल रंगाची पिशवी बळजबरीने हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून वेगाने पोबारा केला.
या पिशवीमध्ये ३ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ५ हजार रुपये किमतीचा ‘रेडमी नोट ७ प्रो’ कंपनीचा मोबाईल फोन, असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.
या प्रकारे धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करत आहेत.



