जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींनी शिक्षण, क्रीडा, कला यांसह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पोलीस दलाचे नाव उज्ज्वल केले आहे. या सर्व गुणवंत पाल्यांचा आज जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.
या कौतुक सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, पोलीस अधीक्षकांनी केवळ सत्कार न करता प्रत्येक विद्यार्थ्यास एक प्रेरणादायी पुस्तक भेट दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. करिअरचे नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांचे विचार आणि त्यांची स्वप्ने जाणून घेतली.
”पोलीस कर्मचारी २४ तास आपले कर्तव्य बजावत असताना, त्यांच्या कुटुंबीयांचा आणि विशेषतः मुलांचा त्याग खूप मोठा असतो. या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळविले आहे. अशा गुणवंत पाल्यांच्या यशाचा गौरव करणे ही पोलीस दलाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. आज दिलेली प्रेरणादायी पुस्तके विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि मोठी स्वप्ने पाहण्याची ऊर्जा निर्माण करतील,” असे प्रतिपादन पोलीस अधीक्षकांनी आपल्या मनोगतात केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, त्यांना भविष्यात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हा या अनोख्या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, पोलीस दलातील इतर मुलांनाही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



