जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी जळगाव पोलिसांतर्फे ५ जून रोजी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी राबविलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांची चांगलीच दाणादाण उडाली. या धडक कारवाईत पोलिसांनी दारूबंदी, जुगार, अंमली पदार्थ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर बडगा उगारला आहे.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत तब्बल १९६ गुन्हे नोंदवून २१ लाख ६५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ५६ जणांवर आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या ३७ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जुगाराच्या ७६ अड्ड्यांवर छापे टाकून ४६,३९५ रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
महिलांचा शोध आणि वॉरंट बजावणी:
या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने काम करत ३४ बेपत्ता महिलांचा शोध लावून त्यांना सुखरूप परत आणले. याशिवाय, न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवत पोलिसांनी ४२ अजामीनपात्र (NBW) आणि ५२ जामीनपात्र वॉरंट बजावले. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारे २ फरार आरोपी आणि ५ तडीपार गुंडांना देखील या मोहिमेत अटक करण्यात आली. अमली पदार्थ (NDPS) विरोधी कारवाईत १० गुन्हे, तर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ४ गुन्हे नोंदवण्यात आले.
वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई:
वाहनांची तपासणी करताना मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १,४४३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यातून तब्बल ९ लाख रुपयांपेक्षा अधिकचा दंड वसूल करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील २०८ हॉटेल्सची कसून तपासणी करण्यात आली. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ६ वाहनांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जळगाव पोलिसांचे हे ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अत्यंत प्रभावी ठरले असून, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे की, अशी कडक कारवाई यापुढेही सुरूच राहील.



